Top Posts

निसर्गरम्य, ऐतिहासिक आणि थंड हवेचे ठिकाण असलेल्या दापोलीतील पर्यटनस्थळे पर्यटकांना भुरळ पाडत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात कोणत्याही ऋतूमध्ये केलेली भटकंती ही कायमच रमणीय असते. निसर्गरम्य, ऐतिहासिक आणि थंड हवेचे ठिकाण असलेल्या दापोलीतील पर्यटनस्थळांची माहिती देणारा हा लेख.निसर्गरम्य कोकण टीम

कोकणचं सृष्टीसौंदर्य तर जग जाहीर आहे. हिरवीगार झाडी, डोंगरांच्या रांगा, विविध देवळं हे तर कोकणाचं वैशिष्ट्य. सुंदर समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले आणि नयनरम्य मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती कायमच कोकणाला आहे. आज आपण पुणे मुंबई पासून जवळ असलेल्या दापोली तालुक्यातील विविध प्रेक्षणीय पर्यटनस्थळांची माहिती करून घेणार आहोत.


दापोली शहरापासून जवळपास ३५ किलोमीटरवर असणाऱ्या केळशी येथे नितांतसुंदर, निवांत आणि खऱ्या अर्थाने रुपेरी वाळूचा समुद्रकिनारा आहे. इथली वाळू अतिशय मऊ आणि चमकदार. हा समुद्रकिनारा जवळजवळ तीन किलोमीटर इतका प्रचंड आहे. या किनाऱ्यावर फिरताना शंख शिंपले गोळा करण्यात बराच वेळ निघून जातो. समुद्रकिनाऱ्यावरील टेकडीवर सरसर चढून जाणं आणि वेगाने घसरत खाली येणं हा येथे येणार्‍या बाळगोपाळांचा आवडता उद्योग. या टेकडीवरून सूर्यास्ताचे विलोभनीय दृश्य पाहण्यास मिळते. निसर्गसौंदर्य भरभरून असतं म्हणजे काय याचा प्रत्यय या भागात फिरताना पदोपदी येतो. मुंबईहून सुमारे अडीचशे किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात कोकण रेल्वेने जाता येते. शिवाय मुंबई-गोवा हायवेने गेल्यास पाच ते सहा तासांत तिथे पोहोचता येईल.


येथून जवळच केळशी गावाच्या दक्षिण टोकाला उटंबर डोंगराच्या पायथ्याशी महालक्ष्मी मंदिर आहे. हे मंदिर पेशवेकालीन असून मंदिराच्या आवारातच भगवान शंकर व गणेश यांचीही देवळे आहेत. मंदिर परिसरातील कमळांच्या फुलांनी गच्च भरलेले कुंड आपले लक्ष वेधून घेते. देवालयाला दोन घुमट आहेत. एका घुमटाखाली महालक्ष्मीचे स्वयंभू स्थान असून दुसऱ्या घुमटाखाली सभागृह आहे. येथे चैत्र शुध्द अष्टमी ते चैत्र शुध्द पौर्णिमा या काळात देवीचा मोठा उत्सव असतो, जो संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द आहे.


केळशीपासून थोडे पुढे आल्यानंतर आंजर्ले हे निसर्गरम्य आणि शांत गाव येथील कड्यावरचा गणपतीसाठी प्रसिद्ध आहे. हे गणपती मंदिर समुद्रालगतच्या टेकडीवर आहे. दाट हिरवळीतील वसलेले हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. पुर्वी मंदिरात जाण्याकरिता होडीतून जावे लागे. परंतु आता खाडी पूल झाल्या असल्यामुळे मंदिराच्या पायथ्यापर्यंत गाडी घेऊन जाता येते. येथील गणेश मूर्ती उजव्या सोंडेची असून बाजूला रिद्धी सिद्धी च्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. मंदिराच्या आवारातच काळ्या पाषाणाचे शिवमंदिर आणि अष्टकोनी तळे आहे. येथे माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.


कड्यावरच्या गणपतीपासून जवळच असलेला आंजर्ले समुद्रकिनारा पर्यटकांचे खास आकर्षण आहे. येथील समुद्र स्वच्छ असून शुभ्र वाळूचा हा किनारा पर्यटकांना मोहित करतो. हा किनारा विस्तृत असून किनाऱ्यावर गर्द झाडी आहे. येथील निसर्गसौंदर्य अवर्णनीय व आल्हाददायक असते. त्यामुळे निसर्गपर्यटनाचा आनंदही लुटता येतो.


पर्यटनादरम्यान प्रवासाचा थकवा घालविण्यासाठी निसर्गरम्य आसूदगावाला आवर्जुन भेट द्यावी. आसूद गावातून वाहणाऱ्या ओढ्याच्या काठाशी श्री व्याघ्रेश्वर मंदिर आहे. सुमारे 800 वर्षापूर्वीचे हे शंकराचे जागृत स्थान अनेकांचे कुलदैवत आहे. मंदिरात प्रवेश करताच समोर दीपमाळ दिसते, मंदिरात बाहेर काळ्या पाषाणाचा नंदी आहे. मंदिराला चारही बाजूने पाच फुटी उंचीची दगडी भिंत आहे. मंदिराच्या बाहेर श्री गणपती आणि श्री दत्ताची छोटी मंदिरे आहेत. देवळाच्या शेजारी एक विहीरसुद्धा आहे.


व्याघ्रेश्वर मंदिरापासून पाचच मिनिटात आपण आसूदबागजवळ पोहचतो. नारळ-पोफळीच्या दाट बागा, वाळत घातलेल्या सुपाऱ्या, खळाळत वाहणारे पाण्याचे पाट आणि पारंपरिक पद्धतीच्या कोकणी टूमदार घरांचे सौंदर्य इथे पाहायला मिळते. भगवान विष्णूचं वेगळ रूप असणार केशवराज मंदिर येथे आहे. नारळ , पोफळी , आंबा , काजू ह्यांच्या गर्द झाडीतून पायवाटेने मंदिरात जावे लागते. हे मंदिर पेशवेकालीन बांधणीचे असून गाभाऱ्यातील श्री विष्णूची मूर्ती पाहून मन प्रसन्न होते. मंदिरासमोरील गोमुखातून येणारे पाणी वर्षानुवर्षे वाहत आहे.येथून जवळच असलेले मुरुड गाव म्हणजे भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे मुळगाव. गावात प्रवेश केल्यावर चौकातच त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे दर्शन घडते. रस्त्याला लागूनच दुर्गादेवीचे पुरातन मंदिर आहे. गाभार्‍यातील दुर्गादेवीची मुर्ती अष्टभूजांची असून ती कर्नाटकातल्या गंडकी नदितील शिळेपासून बनवलेली आहे. मंदिरातील नक्षीकाम केलेले खांब आपले लक्ष वेधून घेतात. चिमाजी अप्पांनी वसई जिंकल्यानंतर पोर्तुगीज घंटा दुर्गादेवीच्या मंदिरात बांधली. ही भली मोठी पितळी घंटा या देवीच्या मंदिरात पाहायला मिळते. मंदिरापासून जवळचं मुरूडची किनारपट्टी असल्यामुळे इथे येणारे पर्यटक या मंदिराला आवर्जून भेट देत असतात.


दापोलीत फिरत असताना समुद्रस्नानाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी कर्देचा किनारा हा उत्तम व सुरक्षित पर्याय आहे. ४ किलोमीटर पसरलेल्या या किनाऱ्यावर शंख शिंपलेसुद्धा सापडतात. मऊसुत वाळूची पुळण असलेला हा किनारा शांत, निवांत आणि प्रदूषणरहित आहे. हिवाळ्यात अनेक स्थलांतरित पक्षी येथे येत असतात.

कर्दे किनाऱ्यापासून दक्षिणेस ६ किमी अंतरावर लाडघरचा वैशिष्ट्यपूर्ण किनारा आहे. या किनाऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथील वाळू लालसर आहे. सूर्यास्ताच्या वेळी किनारा अतिशय सुंदर दिसतो. लाल रंगाच्या अनंत छटा संपूर्ण किनाऱ्यावर पडतात. लाडघर समुद्रकिनारी डॉल्फीन माशांचे अधूमधून दर्शन घडत असते. त्यामुळे येथील समुद्रकिनार्‍याला पर्यटकांची अधिक पसंती आहे. हा किनारा “तामस तीर्थ” या पवित्र नावानेसुद्धा ओळखला जातो.


लाडघरपासून पाचच मिनिटांत आपण बुरोंडीला पोहोचू शकतो. समुद्र सहा योजने मागे हटवून कोकण भूमी निर्माण करणाऱ्या श्री परशुरामांच्या भव्य व सामर्थ्यशाली पुतळ्याचे दर्शन घेतल्यावर मन प्रसन्न होते. ४० फूट व्यास असलेल्या अर्धगोलाकृती पृथ्वीवर परशुरामांची २१ फुटांची उत्तराभिमुख भव्य मूर्ती डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे. चहुबाजूने हिरवाईने वेढलेला परिसर आणि मधोमध भगवान परशुरामांचा भव्य पुतळा असे विलोभनीय दृश्य येथे पाहण्यास मिळते.


यानंतर आवर्जून भेट द्यावी असे ठिकाण म्हणजे दाभोळची श्री चंडिका देवी. गावामधील एका गुहेमध्ये स्थित असलेल्या श्री चंडिका देवीचं दर्शन घेण्यासाठी हजारो भक्त इथे येत असतात. हे मंदिर प्राचीन असून देवीची मूर्ती स्वयंभू आहे. देवीच्या दर्शनासाठी आत प्रवेश करताना दरवाजातून वाकून जावे लागते. गाभाऱ्यात विजेचा वापर केला जात नसल्यामुळे नंदादीपाच्या प्रकाशात उजळलेलं देवीचे रूप पाहून मन प्रसन्न होते. नवरात्रीत देवीचा उत्सव मोठ्या धामधुमीत साजरा केला जातो.


दाभोळहून दापोलीला जाताना नानटे गावाच्या अलिकडे डाव्या बाजूला सुप्रसिद्ध पन्हाळेकाजी लेण्यांकडे जाण्यासाठी रस्ता आहे. कोटजाई आणि धाकटी नद्यांच्या संगमावर असलेली हि लेणी म्हणजे शिल्पकलेचा अप्रतिम नमुना होय. एकूण २९ गुंफा असलेली हि लेणी आपल्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देतात. ह्या लेण्यांमधील बौध्द आणि हिंदू संस्क्रॄतीचा सुरेख मिलाप इथल्या मुर्तींतून आणि चित्रांतून केला गेल्याचे दिसते. बुध्दांच्या वेगवेगळ्या मुर्तींबरोबर इथे गणपती, सरस्वती, आणि इतर देवांच्या मुर्ती बघायला मिळतात. अतिशय शांत आणि रमणीय ठिकाणी असलेली हि लेणी पाहण्यात पर्यटक दंग होऊन जातात.


पन्हाळेकाझी लेण्यांपासून जवळच उन्हवरे गाव आहे. येथे दुरूनच कुठेतरी आग लागल्याचा भास होतो. जमिनीतून वाफा बाहेर पडत असल्याचे अपूर्व दृश्य दिसते. येथील गरम पाण्याचे झरे दिवसरात्र रटमटत असतात. येथील गंधकयुक्त पाण्यात आंघोळ केल्याने त्वचारोग बरे होतात अशी लोकांची धारणा आहे. पर्यटनाचा एक वेगळा पैलू या ठिकाणी अनुभवता येतो.


व्हिडीओ